मोताळा (जि. बुलडाणा) : मोकाट फिरणार्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहराच्या विविध भागांत हैदोस घालून १६ जणांना चावा घेतला. त्यापैकी सहा जण गंभीर जखमी झाले; एकाला औरंगबाद, तर पाच जणांना अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. मोताळा तालुक्यातील बोराखेडी परिसरातून अचानक आलेल्या या पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालत जो दिसेल त्याला चावा घेण्यास सुरुवात केली. सकाळी १२ ते दुपारी २:३0 दरम्यान बोराखेडी रस्त्यावर हल्ला करीत या कुत्र्याने मोताळा फाटा ते आठवडी बाजार असे मार्गक्रमण करीत १६ जणांना चावा घेतला. यामध्ये मोताळा येथील भरत अशोक वानखडे (२५), नितीन विश्वनाथ तायडे (४५), गोपाल अबाराव देशमुख (१८), सचिन रमेश सदानी (२५), शेख. जुनेद शे. मेहमूद (१५), वैभव गणेशराव देशमुख (२१), अरबाज शाह शकुर शाह (१२), राजा मो. रिजवान (३0), खुशी अनिल फाटे (९), तेजस्विनी सुधीर सुरळकर (१0), अंत्री येथील शोभा नरेंद्र सुरडकर (२८), गणेश हरिश्चंद्र इंगळे (११), सांगळद येथील वासुदेव बारसु चौधरी (५0 ), बोराखेडी येथील अमोल दिनकर तायडे (३0), डिडोळा येथील कुसुम समाधान घडेकर (५0), ज्ञानदेव ग्यानदेव गर्दे (५0) अशा आबालवृद्धांसह १६ जणांचा समावेश आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने आठवडी बाजारात चावा घेण्यास सुरुवात केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर बाजारातील ग्रामीण रुग्णालयात जखमींनी लस टोचून घेण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी डॉ सावजी, परिचारिका ढाने, ढाले, कर्मचारी लहासे व शे.जावेद यांनी १0 जखमींना टी.टी. व रॅबीपूर लशीचे एक-एक इंजेक्शन देऊन उपचार केला. ईमोग्लोबीन लशीची उपलब्धता या ठिकाणी नसल्याने सचिन सदानी यास औरंगाबाद, तर खुशी फाटे, रजा मोहम्मद रिजवान, कुसुम घडेकर, ज्ञानेदव गर्दे व रोशनी सुरडकर या पाच जणांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस!
By admin | Updated: August 6, 2015 00:27 IST