अनिल गवई / खामगावभाजप-शिवसेना युतीत घटस्फोट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाल्याने या विधानसभा निवडणुकीत खामगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असल्याचे जवळपास चित्र आज स्पष्ट झाले आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंंत मतदारसंघात १८ उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाजी बुढण यांनी पक्षांतर करून यूडीएफ या राजकीय पक्षाकडून अंतिमक्षणी उमेदवारी दाखल केली, तर भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय स्फोट झाल्याने गेल्या-तीन दिवसांमध्ये राज्यात कमालीची राजकीय उलथापालथ झाली. त्याचे पडसाद आज शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी दिसून आले. खामगाव मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंंत तब्बल १0४ जणांनी अर्जाची उचल केली; मात्र आज प्रत्यक्षात १८ उमेदवारांनी २६ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, हिंदू महासभा, भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रन्ट, मायनॉरिटी डमोक्रेटिक फ्रन्ट, इंडियन मुस्लीम लीग या प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहे.सर्वच राजकीय पक्ष रिंगणात उतरल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, भारिप या राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विद्यमान आमदार दिलीपकुमार सानंदा यांना चवथ्यांदा रिंगणात उतरविले असून, भाजपकडून महाराष्ट्राचे नेते आ. भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र अँड. आकाश फुंडकर रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून माजी आमदार नाना कोकरे, तर भारि पकडून जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने दुसर्यांदा नशीब आजमावत आहेत. शिवसेनेच्यावतीनेही तुल्यबळ लढत देणारा उमेदवार रिंगणात असल्याने आता या मतदारसंघातील लढत पंचरंगी होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
पंचरंगी लढत,राष्ट्रवादीत बंडखोरी
By admin | Updated: September 28, 2014 00:23 IST