राजेश शेगोकार / बुलडाणा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ात राबविण्यात येणार्या पथदश्री प्रकल्पांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकर्यांचे सर्वेक्षण ऑक्टोबरमध्येच पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १९ हजार ८00 शेतकरी तणावग्रस्त असल्याचे वास्तव समोर आल्यावरही हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे धूळ खात आहे. दरम्यान, या वर्षातील पहिल्या चार महिन्यातच ४५ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यामध्ये याच तणावग्रस्त शेतकर्यांचाही समावेश असल्याने कागदी घोड्यांनीही शेतकर्यांचा बळी घेतल्याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने घोषित केलेल्या विविध उपायांमध्ये शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करून तणावग्रस्त शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पथदश्री प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण पूर्ण झाले. जिल्ह्यातील १ हजार ४२0 गावांपैकी १३७ उजाड गावे वगळता १ हजार २८३ गावांमध्ये महसूल विभागाने हे सर्वेक्षण केले. यामध्ये १९ हजार ८00 शेतकरी तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे. या शेतकर्यांसाठी विविध शासकीय योजनांमधून योजनांची निवड करून संबंधिताना योजनेचा लाभ देण्यासाठी आता महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. संबंधित विभागांना तणावग्रस्त शेतकर्यांची यादी पाठवून प्राधान्याने त्यांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांकडून दिले गेले होते; मात्र हे निर्देश केवळ कागदावरच राहिल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. लोणार तालुक्यातील शेषराव हरी इंगळे या शेतकर्याने आत्महत्या केली. दुर्दैव म्हणजे या शेतकर्याचेही नाव तणावग्रस्त शेतकर्यांच्या यादीत होते. संबंधित शेतकर्याला शासकीय योजनांचा लाभ मिळाला असता, तर कदाचित त्यांचाही जीव वाचला असता; मात्र प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतकर्यांच्या जिवावर उठला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील २0 हजार तणावग्रस्त शेतकरी वा-यावर
By admin | Updated: April 21, 2016 02:18 IST