चिखली : दहिहंडीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून चिखलीवरून देऊळगावराजाकडे जात असताना मलगी फाटानजिक अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भिषण अपघातात दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्या दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ ऑगस्टच्या रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.गोपाल गुलाबराव चव्हाण वय २४ रा.गांधीनगर चिखली, रामेश्वर सुधाकर टाकसाळ वय २३ आणि महेश डिगांबर कळसकर वय ३0 रा.पुंडलीकनगर चिखली हे तिघे येथील दहिहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुचाकीने मित्राला प्लंबींग कामाची माहिती देण्यासाठी जात असताना मलगी फाट्यानजिक अज्ञात वाहनाने त्यांच्या हिरोहोंडा पॅशन प्रो क्र.क्रमांक एम.एच.२८ एजी २६६८ ला जोरदार धडक दिल्याने वाहनचालक गोपाल गुलाबराव चव्हाण या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर महेश देविदास कळसकर व रामेश्वर सुधाकर टाकसाळ हे दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द चिखली पोलिसांनी कलम २७९, ३३६, ३३८, ३0४ अ. भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक जी.डी.भोई करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी
By admin | Updated: August 19, 2014 23:17 IST