अपघातवार : बुलडाणा, धामणगाव बढे, मलकापूर पांग्रा येथील घटना बुलडाणा: चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात एक ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना १२ एप्रिलला दुपारच्या सुमारास नांद्राकोळीजवळ घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आढा ता.जाफ्राबाद येथील देवीदास निकाळजे (वय ५५) व संतोषराव सयाजी शिंदे (वय ५०) हे दोघेही रायपूर मार्गे आडा येथून बुलडाण्याकडे दुचाकीने येत होते. दरम्यान, नांद्राकोळीजवळ त्यांची गाडी खड्ड्यात गेली. त्यामुळे दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी लगतच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीवरील देवीदास निकाळजे यांचा मृत्यू झाला असून, संतोषराव सयाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे. प्रवासी वाहन उलटल्याने १० जण जखमीधामणगाव बढे: बाजारासाठी जात असलेले प्रवासी वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाल्याची घटना १२ एप्रिलला सकाळच्या सुमारास घडली. धामणगाव बढे येथील आठवडी बाजार असल्याने कुऱ्हा गोतमारा येथून धामणगावकडे बाजारासाठी जाण्यास टाटा मॅजिक गाडी निघाली. यात दहा प्रवासी होते. रस्त्याने जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात शेरसिंग चव्हाण (५०), संगीता चव्हाण (२२), ईश्वरसिंग धोती (४७), जगन्नाथ धोती (४५), कडुबा तायडे (५०), विमलबाई तायडे (४५), समाधान तायडे (४५), हरिदास खराटे(२१), जिजाबाई तायडे (५०) व सुभद्राबाई तायडे (६६) हे दहा प्रवासी जखमी झालेले आहेत. टाटा मॅजिक उलटल्याची घटना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी पाहताच त्यांनी १०८ क्रमांकावर फोन करून अपघातातील जखमींसाठी रुग्णवाहिका मागवली व सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तत्काळ जखमींना उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पुढील कारवाई धामणगाव बढे पोलीस करीत असून, अपघातातील जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.ट्रेलर उलटल्याने दोन गंभीरमलकापूर पांग्रा : येथील विजय मखमले शाळेजवळ ट्रेलर उलटल्याने गाडीतील दोघे जण गंभीर जखमी झाले असून, जीवित हानी टळली. चाळीस टनाचे रोलर घेऊन नागपूरहून पुणेकडे जाणारी ट्रेलर गाडी १२ एप्रिल रोजी ५ वाजताच्या दरम्यान मलकापूर पांग्रा येथे उलटली. दुसरबीड राहेरी पुलाचे बेरिंग काम सुरु असल्याने नागपूर-मुंबई रोडवरील वाहतूक बिबी, मलकापूर पांग्रा, अढेंरा, देऊळगाव मही मार्गे जालन्याकडे वळवली आहे. मात्र, बिबीवरून देऊळगावमहीपर्यंत मोठमोठ्या जड वाहनांनाच्या रहदारीमुळे कसरत करावी लागत आहे. सध्या बिबी-मलकापूर पांग्रा मार्गावरून वाहतूक सुरु आहे. १२ एप्रिल रोजी उलटलेल्या ट्रेलरमधील वाहक हा गंभीर जखमी झाल्याने व क्लीनर याच्या हाताचे दोन बोटे तुटून पडले आहेत. या दोघांनाही उपचारार्थ मेहकर येथे हलविण्यात आले आहे.
तीन अपघातात एक ठार; १३ जखमी
By admin | Updated: April 13, 2017 00:54 IST