मयूर गोलेच्छा / लोणार: सतत तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या नैसर्गिक आपदेमुळे अवघ्या महाराष्ट्रात दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाले आहे. या संकटावर समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. यामध्ये आता लोणार तालुक्याच्या कृषी विभागानेही दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी आपले हात पुढे केले असून, तालुका कृषी विभागातील कार्यरत कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकर्यांना देणार असल्याचा निर्णय तालुक्यातील कृषी विभागातील कर्मचार्यांनी ४ जानेवारी रोजी स्थानिक कृषी कार्यालयात आयोजित सभेत घेतला आहे. राज्यात दुष्काळग्रस्त आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या शेतकर्यांच्या आत्महत्येचा वारु बेफान असताना त्यांच्या कुटुंबीयांना मदत करायला सर्वात आधी पुढे आले ते संवेदनशील सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. या दोघांनी आपल्या ह्यनामह्ण द्वारे राज्यातील विविध भागात जावून दुष्काळग्रस्त आणि कर्जबाजारी शेतकर्यांच्या कुटुंबीयांना १५ हजार रुपयांची आर्थिक मदत वाटप केली. ह्यनामह्ण च्या या संवेदनशील उपक्रमास समाजातील सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी शेतकर्यांच्या मदतीसाठी आपले हात पुढे केले. त्यामध्येच आता शेतकर्यांशी बांधीलकी जपणार्या कृषी विभागानेही पुढाकार घेतला आहे. तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्या पुढाकारातून राज्यात पहिल्यांदाच कृषी विभागात कार्यरत कर्मचारी, अधिकारी आपले एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून जवळपास ३५ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकार्यांना देऊन शेतकर्यांसाठी मदतीत आपला खारीचा वाटा उचलत आहेत. सध्या राज्यातील शेतकरी बांधव दुष्काळाने होरपळून निघत असल्यामुळे त्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्यापरीने मदतीसाठी हात पुढे केल्यास दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या समस्येवर काही प्रमाणावर राज्य शासनावरील भार हलका होईल. दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या घरातील समस्या गंभीर आहे. तुमची मोलाची मदत या परिस्थितीत शेतकर्यांच्या जीवनात काही प्रमाणात बदल घडविण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यांच्या चिंताग्रस्त चेहर्यावर आनंदाची झुळूक आणू शकते. कृषी विभागातील कर्मचार्यांचा आदर्श घेऊन इतर विभागातील कर्मचार्यांनी देखील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
दुष्काळग्रस्तांना एक दिवसाचे वेतन
By admin | Updated: January 5, 2016 02:08 IST