मलकापूर (जि. बुलडाणा): अतिक्रमणकांनी आप-आपले अतिक्रमण सात दिवसांत स्वत: काढून जागा मोकळी करावी, अशी सूचना शहरात ऑटोरिक्षा फिरवून लाउडस्पीकरद्वारे प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असल्याने अतिक्रमकांमध्ये भय व चिंतेचे वातावरण पसरले आहे. या सूचनेमुळे आता लवकरच शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताला निमंत्रण मिळते. त्यामुळे अतिक्रमण काढून जागा पूर्ववत मोकळी करुन देण्यात यावी, अन्यथा पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन अतिक्रमण काढण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीस यापूर्वीच शहरातील समस्त अतिक्रमकांना बजावण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या तहसील चौक, नांदुरा रोड, रेल्वे स्टेशन रोड या मार्गावर अतिक्रमकांच्या १0५ टपर्या आहेत. उर्वरित मार्ग नगर परिषदेच्या अखत्यारीत असून, या रस्त्यांवर जवळपास ९00 अतिक्रमकांचे कच्चे व पक्क्या स्वरूपातील अतिक्रमण असून, त्यापैकी ८१४ अतिक्रमकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नगर परिषद हद्दीतील तहसील चौक, हनुमान चौक, निमवाडी चौक, आठवडी बाजार, बुलडाणा रोड, चांडक विद्यालय रोड, भीमनगर मार्ग, सूर्यमुखी हनुमान मंदिर मार्ग, गणेश विसर्जन मार्ग, हनुमाननगर मार्ग यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील रहदारीस अडथळे निर्माण करणारे कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजाविण्यात आल्यानंतर आता शहरात ऑटोरिक्षा फिरवून संबंधितांना सूचित केले जात आहे.
मलकापुरात अतिक्रमकांना नोटीस
By admin | Updated: February 20, 2016 02:13 IST