सिध्दार्थ आराख खामगाव, दि. १७- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नविन सदस्यांची निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी पार पडली. आता निकाल २३ फेब्रुवारी रोजी लागेल. मात्र त्यानंतरही निवडून आलेल्या नव्या शिलेदारांना पदभार घेण्यास तब्बल एक महिना वेटींगवर रहावे लागणार आहे. कारण विद्यमान पदाधिकार्यांचा कार्यकाळ हा २१ मार्च पर्यंंत राहणार आहे. दुसरीकडे याच काळात जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सादर करावे लागणार असल्यामुळे यावर्षी प्रथमच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंदाजपत्रक सादर करणार आहेत. तसे आदेश शासनाने काढले आहेत. १५ मार्चला अंदाजपत्रक सादर करून नवीन पदाधिकार्यांना ते अंतिम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्हा परिषद आणि तेरा पंचायत समितींसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होऊन त्यानंतर नूतन सदस्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. पण, विद्यमान पदाधिकार्यांचा कार्यकाळ २१ मार्च रोजी संपत असल्यामुळे महिनाभर नवीन पदाधिकार्यांना थांबावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये २१ मार्च पर्यंंत दुप्पट म्हणजे ११९ सदस्य होणार आहेत. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक २७ मार्चपूर्वी सादर करावे लागणार आहे. यामुळे अंदाजपत्रक सादर करण्यावरून आजी-माजी सदस्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकार्यांना तो सादर करण्याची सूचना दिली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ ह्या १५ मार्चपूर्वी अंदाजपत्रक सादर करणार असल्याचे समजते. त्याआधी २५ फेब्रुवारीपूर्वी १३ पंचायत समितींचे अंदाजपत्रक संबंधित गटविकास अधिकारी सादर करणार आहेत. तेच अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर जिल्ह्य.ाचे एकत्रित अंदाजपत्रक सादर होईल. यानंतर नवीन पदाधिकारी या अंदाजपत्रकास अंतिम मंजुरी देणार आहेत.
नवीन सदस्यांना एक महिना वेटिंग
By admin | Updated: February 18, 2017 03:13 IST