चिखली (जि. बुलडाणा) : शहरातील सर्व मुख्य मार्गांवर मोठे खड्डे पडलेले असून, यामुळे रहदारीच्या समस्या उद्भवल्या आहेत. असे असताना याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने चिखली शहर राष्ट्रवादी काँग्रेस व शहर युवक काँग्रेसने स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते सुधार आंदोलनाद्वारे या समस्येकडे लक्ष वेधले. शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे अपघातास निमंत्रण देणारे ठरत असून, याबाबत नगरपालिका प्रशासनास निवेदने देऊन तसेच वेळोवेळी मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. परिणामी रस्त्याचे खस्ता हाल असून, समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढले असून, खासगी प्रवासी वाहतुकीची वाहनेही रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्ता अत्यंत अरुंद झालेला आहे. पर्यायाने या रस्त्यांवरून पायी चालणेदेखील कठीण होऊन बसले आहे. याची दखल घेत शहर राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने २४ डिसेंबर रोजी रस्त्यावरील जिवघेण्या खड्डय़ांमध्ये मुरूम टाकून रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून रस्ते सुधार आंदोलनाद्वारे पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधून रस्त्याची समस्या त्वरित दूर करण्याची मागणी केली असून, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्ते सुधार आंदोलन
By admin | Updated: December 25, 2015 03:21 IST