बुलडाणा : येथील नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांनी बदली केली आहे. याविषयीचे आदेश १९ मार्च राेजी देण्यात आले आहेत. काही पथकांनी व्यावसायिकांकडून वसुली केल्याची तक्रार आल्याने या बदल्या केल्याची चर्चा होत आहे.
बुलडाणा शहरात काेराेना संसर्ग राेखण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. या पथकाने काही व्यावसायिकांकडून वसुली केल्याची तक्रार राष्टवादी काॅंग्रेसने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली हाेती. याविषयी ‘लाेकमत’नेही वृत्त प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत मुख्याधिकारी महेश वाघमाेडे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागातील राजेश भालेराव यांची काेराेना कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सहाय्यक कर निरीक्षक दिगंबर साठे यांची अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागातील जगराम रतन पवार यांची अतिक्रमण विभागातून काेराेना कक्षात तर शे. मुस्ताक शे. रज्जा यांची आराेग्य विभागातून अतिक्रमण निर्मूलन पथकात नियुक्ती करण्यात आली आहे.