धाड : येथून जवळच असणाऱ्या इजलापूर येथील एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने पलायन केल्याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनला ८ एप्रिल रोजी नोंद करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सिल्लोड येथून या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले. बुलडाणा तालुक्यातील इजलापूर येथील अल्पवयीन मुलगी ‘कान दुखत असून, औषध आणायला जाते’ म्हणून घरून निघाली, मात्र परत आली नाही. याप्रकरणी ८ एप्रिल रोजी धाड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध ३६३ भादंविचा गुन्हा नोंद केला. इजलापूर येथील अल्पवयीन मुलगी ही मढ येथील चक्रधर स्वामी विद्यालयात वर्ग ११ वीत शिक्षण घेत असून, याच शाळेत वर्ग १० व्या मध्ये शिक्षण घेणारा सिल्लोड येथील मुलगा शिक्षणासाठी मावशीकडे इजलापूर येथे राहत होता. दरम्यान, सहा महिन्यांपासून या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत ७ एप्रिल रोजी विवाहाच्या उद्देशाने त्यांनी पलायन केले. या प्रकरणी पो.ठाणेदार सुनील जाधव यांचे मार्गदर्शनात पीएसआय रघुनाथ शेवाळे, पोहेकॉ ओमप्रकाश साळवे, बळीराम खंडागळे, माधवराव कुटे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर त्या प्रेमीयुगुलाचा अवघ्या १२ तासांत शोध घेत सिल्लोड येथून त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस तपास करत असून, दोघेही अल्पवयीन असल्याने या प्रकरणी अद्यापपर्यंत पुढे आणखी काही गुन्हे दाखल झालेले नव्हते; परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता अशा घटनांबाबत समाजात चिंतन होऊन पालकांनी मुलांना चांगले मार्गदर्शन करण्याची गरज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
अल्पवयीन प्रेमीयुगुल ताब्यात
By admin | Updated: April 10, 2017 00:20 IST