देऊळगाव राजा : राष्ट्रीय ध्वज तिरंगा प्रेमाने प्रेरित होऊन 'एक वादळ भारताचं' या राष्ट्रव्यापी चळवळीच्या माध्यमाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ‘राष्ट्रगान’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रजासत्ताक दिनी देशभर राष्ट्रगीताचा सूर निनादणार आहे. ‘हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगीत’ या संकल्पनेतून 'एक वादळ भारताचं' या राष्ट्रव्यापी चळवळीच्या माध्यमाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘राष्ट्रगान’चा कार्यक्रम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
'सार्वजनिक राष्ट्रगान व्हावे, मनी जागली तळमळ, ध्यास घेऊन देशभक्तीचा सुरू झाली एक चळवळ’ या उक्तीप्रमाणे शहरातील युवकांनी राष्ट्रगानसाठी ५२ सेकंद काढण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट व प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी विदर्भासह महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांतील ८७ पेक्षा जास्त शहरात हा कार्यक्रम एकाचवेळी पार पडणार आहे. राष्ट्रगीत व राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे संविधानिक कर्तव्य आहे. याच भावनेने प्रेरित होऊन ‘हर घर तिरंगा हर घर राष्ट्रगीत’ या संकल्पनेतून ‘एक वादळ भारताचं’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. कोविड संसर्गच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करीत राष्ट्रगानाच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करावा, असे आवाहन आकीब कोटकर, आकाश कासारे यांच्यासह आयोजक युवकांनी केले आहे.