संग्रामपूर : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या पहिल्या व ऐतिहासिक निवडणुकीत भारिप- बमसंच्या मीना वानखडे आठ विरुद्ध नऊ मतांनी बाजी मारत नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. दरम्यान, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही याच फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम घाटे यांच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडली. सकाळी ११ वाजता नगर पंचायत कार्यालयामध्ये या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. ओबीसी सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठीे तुकाराम जगदेव घाटे, आनंद राजनकर, हरिभाऊ राजनकर आणि मीना अनिल वानखडे यांचे नामांकन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये परिवर्तन पॅनलच्या मीना अनिल वानखडे यांना नऊ तर नगर विकास पॅनलने पाठिंबा दिलेल्या हरिभाऊ राजनकर यांना आठ मते पडली. त्यामुळे एका मताने राजनकरांचा पराभव होऊन मीना वानखडे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या, तर तुकाराम जगदेव घाटे आणि आनंद राजनकर यांना शून्य मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत रामेश्वर गावंडे व तुकाराम घाटे यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुकाराम घाटे यांना नऊ तर रामेश्वर गावंडे यांना आठ मते मिळाली. त्यामुळे नगराध्यक्षपदी मीना वानखडे आणि उपनगराध्यक्षपदी तुकाराम घाटे हे विजयी झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांनी काम पाहिले तर सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार खंडारे होते. मुख्याधिकारी आर.डी. शिंदे, वरिष्ठ लिपीक रामेश्वर गायकी यांनी त्यांना सहाय्य केले. ठाणेदार बी.आर. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस अधिकारी व ४0 पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरिता उपस्थित होते. निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
नगराध्यक्षपदी मीना वानखडे
By admin | Updated: November 27, 2015 01:45 IST