बुलडाणा शहरात दोन दिवसांपूर्वी बनावट रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन नामांकित रुग्णालयातील कर्मचारी, वॉर्डबाय यांना ९ इंजेक्शनसह अटक केली आहे. १० मेपर्यंत या आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नांदुरा येथेही दहा रेमडेसिविर इंजेक्शन पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत. दोषींवर कारवाई होईलच. या प्रकरणाच्या मागे असलेले सूत्रधार नेमके कोण आहेत हे लक्षात आले आहे. फार दिवस ते लपून राहू शकत नाहीत. योग्यवेळी आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असे राज्याचे अन्न व अैाषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. कोरोना संसर्ग प्रतिबंध आढावा बैठकीच्या निमित्ताने ते ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सोबत अशा प्रकरणातील सूत्रधारांना वाचविण्यासाठी जर कोणी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही मान्य करणार नाही. नागरिकांच्या जीवाशी अशा पद्धतीने खेळ करणारे वाचू शकणार नाहीत.
--ब्लॅक मार्केटिंग करणारे रडारवर--
रेमडेसिविर इंजेक्शनचे ब्लॅक मार्केटिंग करणारे पोलिसांच्या रडारवर असून खबऱ्यांचे नेटवर्कही त्यादृष्टीने सक्रिय करण्यात आले आहे. बुलडाण्यातील सलाईनचे पाणी रेमडेसिविर म्हणून विकण्याचा प्रकारही गंभीर आहे. त्यामुळे ग्रामीण तथा शहरी भागातही पोलिसांनी त्यांचे नेटवर्क अधिक स्ट्राॅग करून बनावट रेमडेसिविर विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आपण पोलिस प्रशासनास दिले आहेत, असेही ते म्हणाले.