संचालक मंडळावर होणार कारवाई : सहकारमंत्र्यांचे आश्वासन
देऊळगावराजा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने बनावट दस्तऐवज सादर करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधीचा अपहार केला. या प्रकरणात चुकीचे काम करणाऱ्या संचालक मंडळाविरुद्ध तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केली आहे. त्यावर संचालक मंडळावर कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मातृतीर्थ मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी विविध विकास प्रश्नाद्वारे निधी देण्याची मागणी चर्चेदरम्यान केली. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काळात झालेल्या गैरव्यवहाराबरोबर निवडणुकीवर बाजार समितीने केलेल्या लाखोंच्या खर्चाबाबत आवाज उठवित कारवाईची मागणी केली. बाजार समिती संचालक मंडळाने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता नियमबाह्य पद्धतीने भुसार मार्केट व गोदामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. तसेच बाजार समितीने केलेले बांधकामदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. याविरुद्ध तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. अशा अनेक बाबींवर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही संभाव्य योजना राबवण्यात आलेल्या नाहीत. उलट संचालक मंडळांनी व संबंधितांनी स्वत:चेच हित जोपासून काळाबाजार केला आहे, असा आरोप आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केला आहे. निवडणुकीच्या खर्चात झालेला घोळाचीसुद्धा चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. निवडणुकीचा खर्च इतर बाजार समितीच्या तुलनेत देऊळगाव राजा बाजार समितीने मोठ्याप्रमाणावर केला. २० ते २५ लाखांचा खर्च दाखविला. याबाबतच्या तक्रारीनंतर कोणतीच कारवाई का झाली नाही, याबाबत सभापतींनी लक्ष घालण्याची मागणी आ.डॉ. खेडकारांनी केली. यावर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लवकरच दोन्ही प्रकरणातील दोषींविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालणारे मनमानी कारभार आणि खोट्या दस्तऐवज सादर करून शासनाला लाखो रुपयांचा अपहार केला आहे. त्याकरिता सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लवकरच दोन्ही प्रकरणातील दोषींविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले आहे.