बुलडाणा : जिल्हा वार्षिक योजनेतील कात्री लागलेला निधी शंभर टक्के मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे मासरुळ सर्कलमध्ये १५ कोटींच्या विकासकामांचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला असल्याची माहिती जि. प. उपाध्यक्षा कमलताई जालिंधर बुधवत यांनी दिली. खा.प्रतापराव जाधव व आ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ही कामे लवकरच सुरू करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
मासरुळ जिल्हा परिषद सर्कलच नेतृत्व जि.प.उपाध्यक्षा कमलताई जालिंधर बुधवत करत आहेत. या भागातील नव्याने पुन्हा विकासकामे प्रस्तावित केली होती. मात्र, कोरोनाचे संकट आले. त्यामुळे वर्षभरापासून निधी अडला होता. जिल्हा नियोजन समितीला केवळ ३३ टक्केच निधी सुरुवातीला मिळाला. या निधीतून गतवर्षाच्या दायीत्वाच्या कामांवर मोठा खर्च झाला. शिवाय कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना आखण्यावर प्रशासनाने खर्च केला. सध्या कोरोना राज्यभरात आटोक्यात येत असून मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेला घोषित निधी हा शंभर टक्के देण्याचे आदेश दिले आहेत. यादृष्टीने नुकतीच जिल्हा नियोजन समितीची सभा तसेच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आढावा रूपाने पार पडली. यात मासरुळ सर्कलमध्ये सुचविण्यात आलेल्या १५ कोटींच्या विकासकामांना हिरवी झेंडी मिळाली आहे,अशी माहिती जि.प.उपाध्यक्षा कमलताई जालिंधर बुधवत यांनी दिली आहे.