देऊळगावराजा : शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्यासह अन्नधान्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील पिंपरी आंधळे येथे सोमवारी रात्री घडली. सदर घटनेत शेतकऱ्याचा लाखोंचे नुकसान झाले.देऊळगावराजा तालुक्यातील पिंपरी आंधळे शिवारात रंगनाथ डोईफोडे या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला रात्री आग लागली. या गोठ्यात ठिबक सिंचनाचे साहित्य, फवारणी पंप, शेती उपयोगी अवजारे व साठवून ठेवलेली गव्हाची पोती जळून खाक झाली. दरम्यान, तलाठी प्रताप सानप यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. गोठ्याला लागलेल्या आगीत शेतकरी डोईफोडे यांचे एक लाख वीस हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकताच सदर शेतकऱ्याने बाजारात विकलेल्या सोयाबीन, कापूस व तुरीला अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या गोठ्यास आग लागल्याने संकट ओढवले आहे.