मयुर गोलेच्छा /लोणार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीत पडलेल्या फुटीमुळे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मेहकर विधानसभा मतदार संघात ३५ वर्षानंतर भाजप प्रथमच स्वबळावर लढत आहे. पक्षाला प्रभावी उमेदवार न मिळाल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या रिपाइं आठवले गटातील मतदार संघाबाहेरील उमेदवारास उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतदार संघातील निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीतमतदार संघातील भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. या मतदारसंघामध्ये गेल्या २५ वर्षापासून युतीच्या माध्यमातून सेना रणांगणात राहिली आहे. जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी २0 वर्षापासून युतीचा भगवा मतदार संघात फडकविला आहे. यावेळी स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्याने मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध समोरासमोर आहेत. शिवसेनेकडून डॉ.संजय रायमुलकर, काँग्रेसकडून लक्ष्मणराव घुमरे, राष्ट्रवादीकडून अश्विनी आखाडे या स्थानिक उमेदवारांविरुद्ध भाजपने चिखली तालुक्यातील अमडापूर जि.प.चे सदस्य नरहरी गवई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय झाल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे भाजपला निवडणूक प्रचारात असंतुष्टांची नाराजी दूर करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
लोणार भाजपामध्ये उमेदवारीवरून दोन गट
By admin | Updated: October 1, 2014 00:23 IST