बुलडाणा: नागपूर खंडपीठाने सूचित केल्यानुसार अखेर राज्य शासनाने २४ ऑगस्ट रोजी लोणार सरोवर विकास समितीची स्थापना केली असून या समितीची पहिली बैठक लवकरच होणार असल्याचे संकेत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान लोणार सरोवर व परिसराच्या विकासासाठी विविध विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या निधीतून तसेच काही योजनांच्या अभिसरणातून येथील विकास साधण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लोणार विकासासाठी आधी गठित करण्यात आलेल्या तीन समित्यांवर नागपूर खंडपीठाने एकच सर्वंकष समिती गठित करण्याचे सूचित केल्यानंतर राज्य शासनाने त्या दिशेने पाऊल टाकत ही समिती गठित केली आहे. अद्याप या समितीच्या पहिल्या बैठकीची तारीख निश्चित झाली नसली तरी लवकरच ती होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. एक प्रकारे शेगाव विकास आराखड्याच्या धर्तीवरच हा विकास होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोणार सरोवर विकासासाठी विविध विभागामार्फत प्राप्त होणारा निधी तसेच योजनांच्या अभिसरणातून २०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत कामे करण्यात येणार होती. टप्पानिहाय भाग पाडून ही कामे करण्याचे निर्देश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ फेब्रुवारी रोजी लोणार सरोवरास भेट देऊन पाहणी करताना दिले होते. दरम्यान पूर्वीच मान्यता दिलेल्या निधीमधून मधल्या काळात साडेसात कोटींची कामे झाली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांतर्गत ९१ कोटी २९ लाख रुपयांची कामे करण्यात येणार असून लोणार पालिका व जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातूनही जवळपास ६१ कोटी रुपयांची कामे करण्याचे त्यावेळी प्रस्तावित होते. सरोवरातील पिसाळ बाभूळ उच्चाटनासाठी ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चातून विभागीय वन्यजीव अकोला अंतर्गत काम करण्यात येत आहे. दुसरीकडे परिसराच्या विकासासाठी १५ कोटी रुपये खर्चून खासगी जमीन संपादनाचाही प्रस्ताव होता. या आराखड्यात मधल्या काळात काही बदलही करण्यात आले होते. आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखील नियुक्त करण्यात आलेल्या लोणार सरोवर विकास समितीच्या आगामी काळात होणाऱ्या बैठकीत आधीच्या आराखड्यात काय बदल करून त्याची अंमलबजावणी केल्या जाते याकडे लक्ष लागून आहे.
--शेगाव विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर काम--
शेगाव विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर लोणार सरोवर विकासाच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी या प्राधिकरणातंर्गत असलेले विशेष कार्य अधिकारी (अेाएसडी), संशोधन सहायक (गट ब) आणि एक लिपीक यांच्या सेवाही लोणार सरोवर विकासासाठी वर्ग केल्या जातील.
--शेगाव विकास आराखड्याची ९६ टक्के कामे--
शेगाव विकास आराखड्याची २००९ पासून कामे सुरू असून गेल्या १२ वर्षात ९६ टक्के कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित ४ टक्के कामे मार्गी लागल्यानंतर यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारीवर्ग हा लोणार सरोवर विकासासाठी काम करेल, अशी माहिती शेगाव विकास आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी शशिकांत माळी यानी दिली.