बुलडाणा: आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशाला लॉकडाऊनचा खोडा निर्माण झाला आहे. अमरावती विभागातील लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या सात हजार ४५७ मुलांचे प्रवेश आता रखडले आहेत. लाॅकडाऊन संपल्यानंतर या प्रवेशाबाबत सूचना दिल्या जाणार असल्याने मुलांच्या शाळा प्रवेशाबाबत पालकांना चिंता लागलेली आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षक हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली होती. त्यानुसार १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती कळविण्यास सुरुवातही झाली होती. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून आपला प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याने आरटीईची ही प्रवेश प्रक्रियाही लांबविण्यात आली आहे. सुरुवातीला जे पालक पडताळणी समितीशी संपर्क साधू शकले नाही आणि त्यानंतर काही दिवसांतच आरटीईची प्रवेश प्रक्रिया थांबविल्याने आता निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशाबाबत पालकही चिंतेत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अमरावती विभागातील १८ हजार ५८२ मुलांपैकी सुमारे ७ हजार ४५७ मुलांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. परंतु ही प्रवेश प्रक्रिया स्थगित झाल्याने पालकांना आरटीईचे प्रवेश सुरू होण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.
जागेपेक्षा दहा हजाराने अर्ज जास्त
अमरावती विभागामध्ये ८ हजार १७१ जागांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु, जागेपेक्षा १० हजार ४११ अर्ज जास्ती आले आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ९८२ शाळांमध्ये आरटीई मोफत देण्यात येत आहेत.
पडताळणी समितीकडे जाण्यासही मनाई
निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नाही. त्यांनी समितीशी संपर्क करून व्हॉट्सॲप किंवा अन्य माध्यमांद्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये. त्यांच्याकरिता आरटीई पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जाणार आहेत.
आरटीई अंतर्गत लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिली जाईल. कोरोनामुळे पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये.
सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
अमरावती विभागात निवड झालेल्यांची संख्या
बुलडाणा १८७९
अकोला १८१७
वाशिम ६३०
यवतमाळ ११५१
अमरावती १९८०