बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यालगत असलेल्या शेतात गुरुवारी सकाळी अस्वलाचे पिल्लू पडले. या पिल्लाला वन विभागाच्या चमूने बाहेर काढून जीवदान दिले. खामगाव तालुक्यातील काळेगाव नांद्रीजवळ शेतातील विहिरीत अस्वलाचे पिल्लू पडले. ही माहिती शेतकऱ्याला मिळताच वन विभागाच्या चमूला माहिती देण्यात आली. ही विहीर १५ फूट खोल होती. विहिरीमध्ये पाणी नसल्यामुळे अस्वलाचे पिल्लू दिवसभर उन्हात होते. घटनास्थळावर डीएफओ बी.टी. भगत यांनी चमू पाठविली. या चमूने पाच महिन्याच्या पिल्लाला बाहेर काढून पिंजऱ्यात टाकले. त्याला ज्ञानगंगा अभयारण्यातील नर्सरीमध्ये ठेवण्यात आले आहे. यावेळी रेस्क्यू चमूचे सदस्य संजय राठोड, समाधान मांटे, एस.डी. राठोड, देवीदास वाघ आदींनी पिल्लाला बाहेर काढण्याकरिता प्रयत्न केले.