‘एटीएम’मध्ये पैसे टाका, अन्यथा बेशरमचे झाड भेट- राणा चंदनबुलडाणा : गेल्या पंधरा दिवसांपासून बुलडाणा शहरातील एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे शहरातील प्रत्येक बँकेच्या एटीएमसमोर गर्दी होत आहे. जनतेचे व नागरिकांचे हाल होत असल्याने २० एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने लीड बँकेच्या संचालकांना घेराव घालण्यात आला. ‘लोकमत’ने २० एप्रिलच्या अंकात ‘अघोषित नोटाबंदी’ या विषयावर विशेष पान केले. याची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन व अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शेख आरीफ शेख करीम यांच्या नेतृत्वात बँक प्रशासनाचे मुख्य अधिकारी यांना घेराव घालण्यात आला. तसेच निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून बुलडाणा शहरातील एटीएममध्ये तत्काळ दोन दिवसांच्या आत पैसे टाका, अन्यथा दोन दिवसानंतर बँकेच्या संचालकांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बेशरमचे झाड देऊन स्वागत करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. बँक अधिकाऱ्यांनी दोन दिवसात एटीएममध्ये पैसे टाकू, असे आश्वासन दिले. यावेळी घेराव आंदोलनामध्ये शेख साजीद आॅटोवाले, शरफान खान, जावेद अहेमद, सय्यद अरिफ, नसीम खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
लीड बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Updated: April 20, 2017 23:34 IST