मेहकर : जीवनामध्ये वीज हा महत्त्वाचा घटक बनला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात अथवा ठिकाणी वीज ही आवश्यक गरज झाली आहे. विजेचा वापर हा आवश्यकतेनुसार करावा. तसेच शक्य तेवढ्या कमी प्रमाणात विजेचा वापर करावा, असे वीज वितरण कंपनीकडून वेळोवेळी सांगण्यात येते. विजेचा वापर कमी करावा, यासाठी शासनाकडून जनजागृतीपर विविध उपक्रम तथा सूचना देण्यात येतात; परंतु मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच विजेचा विनाकारण अपव्यय होत असल्याचे दिसून आले.‘लोकमत’च्यावतीने ३ मे रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. यावेळी मेहकर येथील वीज वितरणच्या उपविभागीय कार्यालयात कार्यालयातील प्रत्येक कक्षाचे लाइट हे चालू होते. त्याचबरोबर खुर्चीवर अधिकारी तथा कर्मचारी नसतानाही पंखे, लाइट सुरू होते. तसेच उपविभागीय अभियंता कलोरे यांचे कार्यालयाला ११.५ मिनिटांनी कुलूप होते. कार्यालयात लाइट लावण्याची दिवसा काही गरज नसतानाही प्रत्येक कार्यालयातील लाइट हे सुरूच होते. शासकीय वेळेवर अधिकारी तथा कर्मचारी आलेले नव्हते. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. विविध कामासाठी येणारे लोक ताटकळत बसले होते. घरगुती, कृषी व्यवसायासाठी कनेक्शन देताना त्या ग्राहकाला सूचना देण्यात येतात, की आपला विजेचा वापर कमी प्रमाणात करावा. जर अशा ग्राहकांनी विजेचा वापर जास्त केला, तर त्याला वीज वापराचे जादा बिले देण्यात येतात. परंतु, वीज कंपनीच्या कार्यालयात विजेचा गैरवापर होत आहे. इतर शासकीय कार्यालयात सारखीच परिस्थितीशहरामध्ये विविध विभागाचे जवळपास ३० ते ३५ शासकीय कार्यालये आहेत. येथेही विनाकारण वापर होताना दिसत आहे. अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावर गेले असता, तसेच इतर कामासाठी बाहेर गेले असता त्या कार्यालयातील पंखे व लाइटसुद्धा दिवसभर सुरूच असतात. त्यामुळे खासगी लोकांसाठी वीज वितरण कंपनीचे नियम असतात. मात्र, यांच्याकडूनच विजेचा गैरवापर होत असल्याने यांना नियम लागू नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्मचारी हजर नसतानाही दिवे सुरूच!
By admin | Updated: May 4, 2017 00:36 IST