जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूची भिंत काढण्याचा ठराव पालिकेत मंजूर झाल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी यावर आक्षेप घेत बोंद्रेंवर टीका केली होती. त्यावरून काँग्रेसचे गटनेत्यांनी पत्रक काढले होते. या पृष्ठभूमीवर मागणी संदर्भाने जितेंद्र बोंद्रेंनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी, सिद्धविनायक बोंद्रे यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात १९७४ च्या सुमारास नगरपरिषद चिखलीला जलशुद्धीकरण केंद्रासाठी स्वत:च्या जमिनीत मुख्य रस्त्यापासून बरेचसे अंतर सोडून आतमध्ये उदात्त मनाने जागा दिलेली आहे. या जागेत जलशुद्धीकरण चालू आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून मुख्य रस्ता (महामार्ग) पर्यंत जमिनीतून जाणारा रस्ता हा फक्त वापर करण्यासाठी आहे. मुख्य महामार्गांपासून या जमिनीतून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूची भिंत काढून रस्ता मोकळा ठेवण्याची मागणी आहे. जलशुद्धीकरण भोवतालची संरक्षण भिंत काढण्याची मागणी नाही व तसा कोणताही हेतू ही नाही. जलशुद्धीकरण केंद्राच्या संरक्षण भिंतीच्या बाहेरच्या भोवतालच्या जमिनीवर नागरीकरण होत आहे. हा मोकळा प्रवाह आहे तो थोपाविणे अवघड आहे. नगरपरिषद चिखलीला महामार्गाजवळ गेट (फाटक) ऐवजी जलशुद्धीकरण केंद्राच्या भोवतालच्या संरक्षण भिंतीला प्रवेशद्वाराजवळ गेट (फाटक) बसवावे लागेल. वापरण्यासाठी असलेला रस्ता बाजूने भिंतीद्वारे अडविता येत नसतो. याबाबतीत नगरपरिषदेला सर्वाेतोपरी सहकार्य व बांधिलकी आहेच, असे स्पष्ट करतानाच या घटनाक्रमामध्ये सिद्धविनायक बोंद्रे यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत गावासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा मिळाला याचे समाधान आहे, असेही जितेंद्र बोंद्रें यांनी स्पष्ट केले आहे.
फक्त रस्त्याची बाजूची भिंत काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST