लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक कार्यकाळात सुरू असलेल्या अंधाधुंद कारभाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू भट्टड यांनी गुरुवार, २८ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
या संदर्भात नंदू भट्टड यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून कारवाई न झाल्यास एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी लेखापरीक्षक वर्ग-२ दीपक जाधव यांना १९ जानेवारी रोजी पत्र देऊन ७ दिवसांच्या आत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. माझ्या समक्ष झालेल्या चौकशीदरम्यान सचिव भिसे व तत्कालीन प्रशासक ओमप्रकाश साळुंके यांनी अनेक गैरकारभार केल्याचे स्पष्ट निदर्शनास आले. चौकशीदरम्यान प्रोसिडिंगची पहाणी केली असता त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्याने सदर प्रोसिडिंगची प्रत देण्याबाबत २३ जानेवारी रोजी मागणी केली असता, आजपर्यंत प्रत देण्यात आली नाही. प्रोसिडिंग बुकमध्ये २७ नोव्हेंबर २० नंतर कोणतीही सभा झालेली नाही? व ११० पाने कोरी असताना नवीन प्रोसिडिंग बुक तयार करून २ जानेवारी २०२१ची प्रशासक कृपलानी यांनी सभा घेतली आहे. मग डिसेंबर २०२० च्या खर्चाला मंजुरी आहे किंवा नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या सर्व गैरकारभारप्रकरणी चौकशी करून तत्कालीन प्रशासक ओमप्रकाश साळुंके, सहायक निबंधक सहकारी संस्था, खामगाव व सचिव मुकुटराव भिसे यांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करावी, याबाबत गुरुवारी नंदू भट्टड यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
फोटो:
-----------