खामगाव: लोकसहभागातुन पाणलोट क्षेत्र विकास व शाश्वत उपजिवीका सुरक्षिततेच्या महत्वकांक्षी कार्यक़्रमामध्ये शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शेतमजुर व भूमीहिनांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे धोरण कृषी विभागाने ठरविले आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक़्रमार्तगत शेतमजुर व भुमीहिनांना पुरक उद्योगासाठी फिरते भांडवल उपलब्ध करुन देण्यास कृषी विभाग पुढकार घेणार आहे. जल, जंगल, जमीन, जनता, जीवजंतु व पर्यावरणाच्या विकासासाठी राज्याच्या मृद व जलसंधारणाच्या कामामुळे गावाच कायापालट करण्यासाठी एकात्मिक पाणलोट शेत्र व्यवस्थापन कार्यक्रम (केंद्र पुरस्कृत आयडब्युएमपी) अंतर्गत २0११ ते २0१६ पर्यंत राबविला जात आहे. या कार्यक्रमात खामगाव तालुक्यातील आसा, दुधा,आंबेटाकळी, कंचनपुर, बोथाकाजी (सावरखेड उजाड), बोरी, अडगाव, शहापुर, देऊळखेड, लोणीगुरव, गवंढाळा, शिर्ला नेमोने, पिंप्री धनगर, जयरामगड व दस्तापुर या गावांचा समावेश आहे. सन २0११-१२ पासुन तालुक्यात या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत यातील प्रवेश प्रेरक उपक्रमांर्तगत व्यायामशाळा साहित्य, स्वयंपाकाची भांडी आदि लोकोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. वरील समाविष्ट असलेल्या गावामधील ७ हजार ७११ हेक्टर क्षेत्रांवर सामुहिक विकास आराखड्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. शेतकरी, शेतमजुर, तसेच भुमीहिनांच्या विकासाठी ९ कोटी २४ लक्ष रुपये या पाच वर्षाच्या कार्यक्रमासाठी मिळणार आहेत. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांर्तगत आतापर्यंत तालुक्यात जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर ढाळीचे बांधाचे कामे केली आहेत. तर यापुढे सिमेंट नालाबांध, मातीनालाबांध, सलग समतलचर आदी कामे होणार आहेत. शेतकर्यांच्या सर्वांगिण विकासाबरोबर ग्रामिण भागातील शेतमजुर, भुमीहीनांच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरीता त्यांना पुरक उद्योगासाठी कृषी विभाग या योजनेतुन फिरते भांडवल उपलब्ध करुन देणार आहेत. यामुळे शेतमजुर व भुमीहीनांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक प्रकारे मदत होणार आहे.
भूमिहीनांच्या मदतीसाठी कृषी विभाग घेणार पुढाकार
By admin | Updated: June 2, 2014 00:34 IST