बुलडाणा : शहरातील ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील पाेथ हिसकावून तिला विहिरीत ढकलून दिल्याची घटना १५ जानेवारी राेजी घडली हाेती. दरम्यान, ही महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच पोलिसाच्या प्राथमिक तपासात आरोपी निघाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पाेलीस काेठडी सुनावली आहे.
बुलडाणा शहरातील जगदंबा नगर भागात राहणारी ५५ वर्षीय महिला बेबाबाई मधुकर बावणे या १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी गेल्या हाेत्या. बराच वेळ त्या परत आल्या नाही. अशात सुरेश साहेबराव पवार रा. सावित्रीबाई फुले नगर, बुलडाणा याने बेबाबाईच्या घराजवळ येऊन माहिती दिली की बेबाबाई बुलडाणा वन विभागाच्या राणी बागला लागून असलेल्या विहिरीत पडलेल्या आहेत. त्यामुळे नातेवाइकांनी विहिरीकडे धाव घेऊन त्यांना बाहेर काढले व जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अकोला येथे बेबाबाईचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकोला पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवशी घातपाताची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलिसाने डॉग स्कॉड घेऊन परिसर पिंजून काढला होता. या घटनेप्रकरणी मृतकाच्या नातेवाइकांना काही संशय आला होता. त्यानंतर बेबाबाई यांचा मुलगा कार्तिक मधुकर बावणे याने आपल्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोथ किंमत ३ हजार २०० रुपये गायब आहे. या पोथीसाठीच आईसोबत लुटमार करून मारहाण झाली व त्यामुळे आईचा मृत्यू झाला, अशी फिर्याद दिल्याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिली हाेती. या प्रकरणी पाेलिसांनी भादंवि कलम ३९७ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी बारकाईने प्रकरणाचा तपास सुरू केला असता तपासात बेबाबाई विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्ती सुरेश पवार हाच आरोपी असल्याचे समाेर आले. त्यामुळे सुरेश पवारला ३१ जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच आराेपीला १ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अभिजित अहेरराव करत आहे.