बुलडाणा : कुठल्याही प्रदेशाची प्रगती मोजताना त्या प्रदेशातील रोजगाराची पातळी विचारात घेतली जाते. बुलडाणा जिल्ह्याचा विचार केला तर आजही कृषी क्षेत्रावर आधारित रोजगार एवढीच बुलडाण्याची क्षमता आहे. औद्योगिक विकासासाठी विपूल प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध असतानाही येथील उद्योग व्यवसाय भरभराटीस आला नाही. राज्य शासनाने स्थापित केलेल्या औद्योगिक वसाहतीपैकी मलकापूर, खामगाव या दोन वसाहती सोडल्या तर उरलेल्या औद्योगिक वसाहतींना कुठलीही ओळख नाही. त्यामुळे या जिल्ह्यात रोजगाराची पातळी वाढविणारे औद्योगिक क्षेत्र विकसित होण्याची गरज आहे. जिल्ह्यात सात औद्योगिक वसाहती आहेत; मात्र यामध्ये केवळ बोटावर मोजता येतील असे उद्योग कार्यरत आहेत. खामगाव येथे सर्वाधिक २७७ उद्योग सुरू असून त्याखालोखाल मलकापूरमध्ये १७२ उद्योग कार्यरत आहेत. चिखली, शेगाव, मेहकर, नांदुरा, जळगाव जामोद अशा महत्त्वांच्या शहरांमध्ये रोजगाराची मागणी मोठय़ा प्रमाणात असतानाही येथील औद्योगिक वसाहतींना उद्योगाचे दर्शन झाले नाही. चिखलीच्या औद्योगिक वसाहतीत आजही शेती केल्या जाते. बुलडाण्यातील औद्योगिक वसाहतींमधील अनेक भूखंडांचे वाटप रखडलेले आहे. मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुर्यातही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे विपूल प्रमाणात असणारे मनुष्यबळ हे शेती, बांधकाम व सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधत आहेत. येथील बाजारपेठेला मालाचा पुरवठा करणारा उद्योग जिल्ह्यात यावा, उद्योजकांना उद्योगासाठी मिळणार्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पाण्याची समस्या भेडसावणार नाही, त्याचे नियोजन व्हावे व उद्योगामध्ये भांडवल निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे तरच येथील उद्योग क्षेत्र भरभराटीस येईल. नव्या सरकारकडून उद्योगावर विशेष भर दिल्या जात असल्याने बुलडाण्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही अच्छे दिनची अपेक्षा आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला अवकळा
By admin | Updated: December 5, 2014 00:12 IST