बुलडाणा : तंत्रज्ञान व औद्यागिक विकासाचे वारे देशभरात वाहत असताना, बुलडाणा जिल्हा यात मागे नाही. नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तंत्रज्ञानविषयक अभ्यासाची कास धरून देशाच्या विकासासाठी येथील विद्यार्थी सज्ज होत आहेत. जिल्ह्यातील १३ औद्यागिक प्रशिक्षण संस्थांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार असून, यावर्षी हजारो विद्यार्थी औद्यागिक प्रशिक्षणाकडे वळणार आहेत. दहावी व बारावीचा निकाल घोषित झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू होते; परंतु यावर्षी काही तांत्रिक अडचणींमुळे जूनच्या दुसर्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे तसेच यावर्षी प्रथमच आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यादरम्यान विद्यार्थ्यांची तारांबळ उडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. औद्यागिक प्रशिक्षण संस्थांतील प्रवेशाबाबत वेळेपर्यंत शासनाने निर्णय न दिल्यामुळे विद्यार्थ्यांंमध्ये नाराजीचा सूर होता; परंतु प्रवेश ऑनलाइन करण्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर आयटीआय प्रवेशाचे कोडे सुटले आहे. आज बर्याच आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून आयटीआयमध्ये कॅम्पस मुलाखती घेऊन युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढत असल्याने औद्यागिक प्रशिक्षणाकडे युवकांचा पूर्वापार असलेला दृष्टिकोण आता बदलला आहे. त्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे.
विद्यार्थ्यांचा कल औद्योगिक प्रशिक्षणाकडे!
By admin | Updated: June 15, 2016 02:00 IST