कारसह सव्वातीन लाखाचा ऐवज जप्तशेगाव : दारुची अवैध वाहतूक करीत दादागिरी करणे येथील राकाँ महिला आघाडी तालुकाध्यक्ष पुत्राला भोवले. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारसह दारु असा सव्वा तीन लाखाचा ऐवज जप्त केला. शहरातील राज्य मार्गालगतची दारु दुकाने बंद झाल्याने रेल्वे लाइन लगत असलेल्या दारु दुकानावर गर्दी होत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वे प्रशासनासह शहर पोलिसांत या भागातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत; मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी महिला कॉंगे्रस तालुकाध्यक्ष नंदाताई पाऊलझगडे यांचा मुलगा आकाश व गोपाल गायकवाड हे स्कार्पिओ गाडी क्र. एमएच ३० व्ही २२२० या वाहनाने लखपती गल्लीतून रेल्वे रुळाबाहेर अवैध दारूची डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना लखपती गल्लीतील कैलास नंदकिशोर राठी यांना कट मारून गेला. याबाबत हटकले असता, दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी येथील नागरिकांना अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आकाश व गोपाल या दोघांना ताब्यात घेतले व स्कार्पिओ गाडीसह विदेशी दारू एकूण किंमत 3 लाख 25 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान कैलास राठी यांच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर लखपती गल्ली परिसरातील दोनशे ते तीनशे नागरिक एकत्रित जमा होऊन पो.स्टे.ला गेले होते.
अवैध दारु वाहतूक;दादागिरी भोवली
By admin | Updated: April 20, 2017 01:25 IST