बुलडाणा : ‘ग्रामीण क्षेत्राकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित होऊन त्या भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होतील व ग्रामीण युवकांना स्वत:चे गाव, घर आणि कुटुंब सोडून रोजगाराकरिता शहरात जायची गरज पडणार नाही, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. मॉडेल डिग्री कॉलेजच्या वाणिज्य विभागामार्फत, विद्यार्थ्यांकरिता आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय ई-सेमिनारमध्ये उद्घाटक व बीजभाषक म्हणून ते बोलत होते.
बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘कोरोनानंतरच्या काळातील रोजगाराच्या संधी’ या एकदिवसीय ई-चर्चासत्राचे आयोजन मॉडेल डिग्री कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आले हाेते़
या ई-चर्चासत्राला उद्घाटक, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत गाडगे बाबा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे होते. हे चर्चासत्र एकूण दोन सत्रांमध्ये विभागले गेले होते. प्रथम सत्राचे बीजभाषक म्हणून स्वतः कुलगुरू डॉ. चांदेकर होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ. केदार ठोसर हे होते, तर द्वितीय सत्राचे बीजभाषक अमरावती विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. दिनेश निचित हे होते. दुसऱ्या सत्रामध्ये राज्याच्या विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शोधनिबंध सादर केले. दुसऱ्या सत्रात एल.आर.टी. कॉलेज, अकोलामधील डॉ. वंदना मिश्रा या अध्यक्षस्थानी हाेत्या. शोधनिबंध सादरकर्त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यस्तरीय कमिटीमध्ये एम.ई.एस. कॉलेज, मेहकरचे डॉ. उदय काळे व एस.पी.एम. कॉलेज, चिखलीचे डॉ. अनिल पुरोहित हे होते, तर महाविद्यालयीनस्तरीय कमिटीमध्ये मॉडेल डिग्री कॉलेजमधीलच डॉ. रूपाली हिवाळे, प्रा. मुरलीधर जाधव आणि प्रा. योगेश फासे हे होते. या चर्चासत्राच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ. केदार ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक प्रा. नरेंद्र नजरधने, सहसंयोजक प्रा. दीपक नन्हई, तर सचिव प्रा. दीपेंद्र परमार यांनी परिश्रम घेतले़