मलकापूर (जि. बुलडाणा): भरवस्तीतील घराला आग लागुन या आगीचा फटका आजुबाजुच्या तीन घरांनाही बसला. यामध्ये दोन घरे पूर्णत: जळुन खाक झाली. त्यामध्ये एकंदर ३ लाख ६३ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मौजे बेलाड या गावात घडली.मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील मोहन वसंतराव रत्नपारखी यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील फ्रिज, २ पंखे, कलर टिव्ही, शेगडी, सिलींडर, मोबाईल, ४ ग्रॅम सोन्याचे कानातील दागिनेसह टिनपत्रे, लोखंडी अँगल, पलंग, मिक्सर तथा घरातील किरकोळ साहित्य व घर बांधण्याकरीता घरात आणून ठेवलेले नगदी रोख स्वरूपातील ९० हजार रूपये मिळून २ लाख ३ हजार रूपयाचे या आगीत नुकसान झाले. या आगीच्या फटक्यात निरंजन वसंतराव रत्नपारखी यांचेही घरातील सर्व साहित्य व घर जळून खाक होत त्यांचे १ लाख २१ हजार पाचशे रूपयाचे नुकसान झाले. यांनाही घर बांधण्याकरीता घरात आणून ठेवलेले नगदी रोख ५० हजार रूपयाच्या नोटा या आगीत जळून खाक झाल्या. त्यामुळे दोन्ही कुटुंबे निराधार झाली आहेत.हीच आग लवकर आटोक्यात न आल्याने उत्तम रामभाऊ रत्नपारखी यांच्या व संतोष पुंजाजी पारसकर यांच्याही घराला क्षती पोहचून अनुक्रमे ३१ हजार व ८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली ही बाब स्पष्ट झाली नसली तरी घरातील दिव्यामुळे आग लागल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. ग्रामस्थांनी आग विझविण्याकरीता शर्थीचे प्रयत्न केले. सदर प्रयत्न सुरू असताना मलकापूर नगर परिषदचे अग्निशमन वाहन सुध्दा घटनास्थळी जावून धडकले. अशा संयुक्त प्रयत्नातून तब्बल १ ते दिड तासांनी आग विझविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत या घरांचे ३ लाख ६३ हजार रूपयाचे या आगीत नुकसान होवून बसले होते.घटनेची माहिती कळताच जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे, आ.चैनसुख संचेती व भाजपा नेते शिवचंद्र तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर निवासी नायब तहसिलदार गजानन राजगडे, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण उगले, तलाठी पी.एल. मेढे यांनी घटनास्थळी जावून नुकसानीचा पंचनामा केला. दरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक तायडे यांनीही बेलाडला भेट दिली.
भीषण आगीत दोन घरांची राखरांगोळी
By admin | Updated: April 8, 2017 17:26 IST