खामगाव : शॉटसर्कीटमुळे घराला आग लागून घरातील विविध साहित्य जळून लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची घटना आज ८ ऑगस्ट रोजी स्थानिक भगतसिंग चौकात दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. स्थानिक भगतसिंग चौकात कंत्राटदार सुभाष टुटेजा यांचे दुमजली घर आहे. वरच्या मजल्यावर भाडेकरू समीर महेंद्र मंत्री राहतात. आज ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सौ. मंत्री ह्या घरातील कामे आटोपून राख्या खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. दरम्यान काही वेळातच त्यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे दिसून आले. शेजार्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच नगर पालिकेच्या अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशमन विभागाचे वाहन जायला पुरेशी जागा नव्हती त्यामुळे परिसरातील नागरीकांनी इतर टँकरव्दारे पाणी आणून आग विझवण्यास मदत केली. तर अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनीही यावेळी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत घरातील फ्रीज, गादी, पलंग, कपाट, कपडे यासोबतच इतरही साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. तीन खोल्यांमध्ये ही आग पसरली होती. यामध्ये मंत्री यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शॉटसर्किटमुळे घराला आग
By admin | Updated: August 9, 2014 00:04 IST