धामणगाव बढे : मोताळा तालुक्यात सहा व सात सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर कृषी विभाग तसेच महसूल विभागातर्फे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करणे सुरू आहे. दरम्यान, झालेल्या अति पावसामुळे वडगाव महाळुंगी शिवारातील शेतामधील पिकांमध्ये अद्यापही पाणी आहे. सध्या अधूनमधून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे त्या शिवारातील अनेक शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी १२ सप्टेंबर राेजी केली आहे.
सततच्या पावसामुळे वडगाव शिवारात पाणी साचले आहे. त्यामुळे पिके पिवळी पडून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी वडगाव महाळुंगे शिवारातील शेतकरी भागवत नरोटे, रघुनाथ मोतीराम शिंदे ,सोनू त्र्यंबक शिंदे, वेडू मालाजी पाटील, वासुदेव पुंडलिक शिंदे, विजय सरदळ, शांताराम सरदळ, आकाश बेदारे, प्रल्हाद बेदारे, योगेश शिंदे यांनी केली आहे.
मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या नुकसानीची पाहणी सुरू आहे. परंतु, शेतजमिनीचे चिभडीचे सर्वेक्षण कुठेही सुरू नाही. वडगाव महाळुंगी शिवारातील चिभडलेल्या शेतीचेसुद्धा सर्वेक्षण करण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
भागवत नप्ते, सामाजिक कार्यकर्ते, वडगाव महाळुंगी