बुलडाणा/खामगाव : संततधार सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात चार दिवस मुक्काम ठोकला असून, सात तालुक्यात अतवृष्टी झाली आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे पूर्णा व ज्ञानगंगा या दोन मोठय़ा नदयांना पूर आला. त्यामुळे जळगाव जामोद, नांदुरा, संग्रामपूर व शेगाव या चार तालुक्यांमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील मोताळा १0८ मिमी., मलकापूर १२८ मिमी., नांदुरा १८१ मिमी., खामगाव १५५ मिमी., जळगाव जामोद १0५ मिमी., शेगाव ७८ मिमी., सिंदखेड राजा तालु क्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, अतवृष्टी झाली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच घरांची पडझड व जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे जळगाव जामोद व नांदुरा तालुक्याचा जनसंपर्क सोमवारपासूनच तुटला आहे.
- शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील राजू सपकाळ यांच्या मालकीचे दोन गाढव विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले आहेत. खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील ७ कुटुंब, पहुरजिरा येथील १२ कुटुंब व मोरगाव डिग्रस येथील दोन कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. शेगाव येथून टाकळीकडे जाणारा मार्ग बंद असल्याने चार विद्यार्थ्यांना शेगाव येथीलच शाळेत रात्र काढावी लागली.
-पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यूबोर्डी नदीच्या पात्रात ७८ वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना शेगाव तालुक्यातील वरखेड येथे सोमवारी रात्री घडली होती. या महिलेचा मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला आहे. शवविच्छेदनानंतर या महिलेचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला.-संततधार पावसामुळे मंदिराचे टीनशेड कोसळले!मोताळा तालुक्यातील भोरटेक येथील हनुमान मंदिराचे टीनशेड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. मागील २५-३0 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मंदिरासमोरील बांधकाम करण्यात आले होते. १३ टिनाच्या या शेडचे बांधकाम आतून मातीचे असल्यामुळे संततधार पावसामुळे कोसळून नुकसान झाले आहे.