लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असतानाच ४२७ प्रतिबंधीत क्षेत्रातील दोन लाख २८ हजार ४८२ नागरिकांचे आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने आरोग्य विषयक सर्व्हेक्षण केले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यापैकी १३ जुलै पर्यंत साडेसहा टक्के नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्याची संख्या १५ हजार २१४ आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्याने जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांची तपासणी होत असून कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील ४२७ प्रतिबंधीत क्षेत्रातील २३ हजार ४८९ घरांचे आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात प्रत्यक्षात ४८० व्यक्तीं सारी रोगाने पीडित असल्याचे स्पष्ट झाले आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या सध्या २०६७ असून सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत असलेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण बाधीत व्यक्तींशी त्याची तुलना करता जिल्ह्याचा मृत्यूदर १.८३ टक्क्यांवर आला आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोना बाधीतांचा मृत्यूदर बुलडाणा जिल्ह्यात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.बुलडाणा जिल्ह्यातील सध्याची एकूण लोकसंख्या ही एका अंदाजानुसार २७ लाखांच्या घरात असून कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे ४२७ प्रतिबंधीत क्षेत्रात यापैकी दोन लाख २८ हजार ४८२ व्यक्ती राहतात. त्यापैकी संदिग्ध आढळलेल्या १५ हजार २१४ व्यक्तींची कोरोना चाचणी झालेली आहे. त्यातील प्रत्यक्षात दोन हजार ६७ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या आहेत. त्यातील एक हजार २३४ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. परिणामी प्रत्यक्षात ७९५ बाधीतांवर १३ जुलै रोजी जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख २८ हजार नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 19:04 IST