बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील ३६ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे काम आपको कंपनीमार्फत सुरू आहे. या महामार्गाच्या खालच्या बाजूला रस्ता आहे. या ठिकाणाहून दिवसभर महामार्गाच्या कामावरील ट्रक ये-जा करीत असतात. यामुळे रस्त्यालगतच्या शेतांत मोठ्या प्रमाणात धूळ जाते. परिणामी, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. सध्या तूर, हरभरा, गहू पीक शेतामध्ये उभे आहे. धुळीमुळे शेतामध्ये मजूर कामाला येत नाहीत. शेतकरी या धुळीने त्रस्त झालेले आहेत. नियमाप्रमाणे रस्त्यावर पाणी मारले जात नाही. दिवसातून तीन वेळा या रस्त्याला पाणी मारले पाहिजे. जेणेकरून धूळ उडणार नाही. पण, कंत्राटदार रस्त्यावर पाणीच मारत नसल्याने कंटाळून कल्याणा या गावातील शेतकरी अनिरुद्ध तांगडे, अनंथा गारोळे, सोनू बोडखे, संतोष गारोळे, दिलीप काकडे यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उभे राहून बुधवारी दुपारपासून कामावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. संबंधित अधिकाऱ्याला बोलाविल्याशिवाय वाहन पुढे जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे अधिकाऱ्यांची या वेळी तारांबळ उडाली. शेतकरी तांगडे यांनी नियमानुसार दिवसातून तीन वेळा पाणी फवारणी झाली नाही, तर शिवारातील सर्व शेतकरी एकत्र येऊन काम बंद पाडू, असा इशारा दिला.
धुळीमुळे पिकांच्या प्रकाश संश्लेषण व शोषण क्रिया बाधित
शेतातील पिकाला धुळीमुळे प्रकाश संश्लेषण व शोषण क्रिया ह्या बाधित होतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते.
महसूल व कृषीच्या वतीने संपूर्ण महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांची पिकाची पाहणी करून सर्व्हे केलेला आहे. संपूर्ण अहवाल आम्ही शासनदरबारी पाठविणार आहोत.
- विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी, मेहकर.