ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. २१- एकीकडे शासनाच्यावतीने पर्यावरण संरक्षणाकरिता नदीतील रेती उपशावर प्रतिबंध घालण्याकरिता प्रयत्न केले जात आहे त, तर दुसरीकडे जिल्ह्यातील रेतीघाटांमध्ये शासनाच्यावतीने वाढ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी जिल्ह्यात ४५ रेतीघाट होते, तर यावर्षी ५९ रेतीघाटांमधून ९२ हजार ४८९ ब्रास रेतीसाठा निर्धारित करण्यात आला आहे. अवैध रेती उपसा वाढल्याने पर्यावरणाचा र्हास होत आहे. त्यामुळे शासनाकडून रेती उपसा करण्याची र्मयादा ठरवून देण्यात आली आहे. त्यासाठी रेतीघाटांचा लिलाव केल्या जातो. गेल्या काही वर्षांपासून रेतीघाटाचा ई-लिलाव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या ई-लिलाव कार्यक्रमानुसार रेती घाटाची हर्रासी केली जा ते. रेतीचा अवैध उपसा करणार्यांवर महसूल विभागाकडून कार्यवाही करण्यात येते. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात रेतीघाटांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्यातील एकूण ४५ रेती घाटांवरून ८३ हजार ६३७ ब्रास रेती साठा निर्धारित करण्यात आला होता. त्यानंतर सन २0१६-१७ मध्ये जिल्ह्यातील रेती घाटांमध्ये वाढ होऊन ५९ रेती घाट झाले. या रेती घाटावरून ९२ हजार ४८९ ब्रास रेती साठा निर्धारित करण्यात आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यात दोन रेती घाटांवरून ५ हजार ७२ ब्रास रेती साठा निर्धारित करण्यात आला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील तीन रेती घाटांवरून १९ हजार ५0६ ब्रास रेती साठा, मेहकर तालुक्यातील दोन रेती घाटांवरून १ हजार ६१0 ब्रास, लोणार तालुक्यातील चार रेती घाटांवरून २४ हजार ५५0 ब्रास, मलकापूर तालुक्यातील हिंगणा नागापूर येथील एका रेती घाटावरून २२९ ब्रास, नांदुरा तालुक्यातील बेलाड या एका रेती घाटावरून ३३६ ब्रास, शेगाव तालुक्यातील सहा रेती घाटांवरून ३ हजार ९८६ ब्रास, जळगाव जामोद तालुक्यातील आठ रेती घाटांवरून २३ हजार ३१४ ब्रास, संग्रामपूर तालुक्यातील ३२ रेती घाटांवरून १३ हजार ५८६ ब्रास रेती साठा निर्धारित करण्यात आला आहे; परंतु निर्धारित केलेल्या रेती साठय़ापेक्षाही जास्त रेतीचा उपसा होत असल्याने शासनाचा महसूलही बुडतो. रेती उपसा वाढल्याने पर्यावरणाचाही मोठय़ा प्रमाणावर र्हास होतो. असे आहेत रेतीचे प्रतिब्रास दरजिल्ह्यातील ५९ रेती घाटांवरून ९२ हजार ४८९ ब्रास रेती साठा निर्धारित करण्यात आला असून, ९३0 रुपये प्रतिब्रास हर्रासीतील दर आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील रेती घाटांवर १ हजार ३२६ रुपये प्रतिब्रास, सिंदखेड राजा तालुक्यातील रेती घाटांवरून १ हजार २0६, मेहकर तालुक्यातील रेती घाटावरून ५४६ रुपये प्रतिब्रास, लोणार तालुक्यातील रेती घाटांवरून ८५८ रुपये ब्रास, मलकापूर तालुक्यातील हिंगणा- नागापूर येथील एका रेती घाटावरून ९६९ रुपये प्रतिब्रास, नांदुरा तालुक्यातील बेलाड या एका रेती घाटावरून १ हजार ७६१ प्रतिब्रास, शेगाव तालुक्यातील रेती घाटांवरून १ हजार १८६ रुपये प्रतिब्रास, जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाटांवरून ६६९ रुपये प्रतिब्रास, संग्रामपूर तालुक्यातील रेती घाटावरून ८९७ प्रतिब्रास दर ठरवण्यात आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील रेती घाटांमध्ये वाढ!
By admin | Updated: January 22, 2017 03:01 IST