बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत १४ एप्रिलच्या सायंकाळपासून संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकानेच सुरू राहणार आहेत. या दुकानांची वेळ प्रशासनाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच केली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली आस्थापना / दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. दूध विक्री व वितरण केंद्र सकाळी ६ ते सकाळी ११ व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. कृषिसंबंधित सर्व दुकाने, आस्थापना या सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणीपुरवठा व नगरपालिका, महावितरण ही कार्यालये २४ तास सुरू राहणार आहेत.
जिल्ह्यातील इतर सर्व कार्यालये, बँका, एटीएम, विमा कार्यालये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. पेट्रोलपंप हे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. हायवेवरील व शहर / गावाबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरू राहतील. खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. तथापि, संबंधितांना सोबत आवश्यक कागदपत्रे बाळगणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतूक नियमितरीत्या सुरू राहील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ रुग्णालये, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला, फळ दुकाने, डेअरी, मटण, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरू राहतील व इतर सर्व सेवा बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व वैद्यकीय सेवा व त्यासंबंधीच्या इतर सेवा २४ तास सुरू राहतील.
हा आदेश १ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू राहणार आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १९८७, भारतीय दंड संहिताच्या कलम १८८ व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.