पिंपळगाव राजा (जि. बुलडाणा): येथील ज्ञानगंगा नदी पात्रातील हजारो ब्रास रेतीची अवैधरीत्या वाहतूक करण्यात आल्याने नदी पात्रात आठ ते दहा फुटापेक्षा खोल खड्डे पडले आहेत, त्यामुळे शेतकर्यांचे शेतात जाण्याचे रस्ते बंद पडले आहेत. या भागातील जलस्त्रोत बाधित होऊ नये, त्यामुळे ज्ञानगंगा नदी पात्रातील वाळू उपसाबंदी आहे; मात्र महसूल विभाग व पोलीस विभागाच्या उघड प्रोत्साहनामुळे वाळू उपसा मोठय़ा प्रमाणात होऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या खड्डय़ांचे मोजमाप होऊन संबंधित वाळू तस्कराविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केल्या जात आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा इंधन विहीर तसेच पुलानजिक वाळू उपसा करण्यास कायदेशीर मनाई आहे, असे असताना स्थानिक पाणीपुरवठा इंधन विहीर तसेच १00 मीटर लांबीच्या पुलानजिकपासून वाळूचा उपसा करून त्याची तस्करी करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या व पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारास जबाबदार अधिकारी व कर्मचार्यांविषयी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
ज्ञानगंगा नदीपात्रातून अवैध रेती उपसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 23:23 IST