बुलडाणा : शहरातील सुप्रसिद्ध सर्जन तथा उर्दू शायर डॉ. गणेश गायकवाड यांच्या उर्दू गझल लेखनाप्रित्यर्थ अकोल्यामध्ये २६ जानेवारी रोजी ‘एक शाम डॉ. गणेश गायकवाड के नाम’ या गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ. गणेश गायकवाड यांना ‘उर्दू साहित्यातील संत’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कुल हिंद बजम अदब व सफाकत (अखिल भारतीय साहित्य व संस्कृती संस्था), अकोलाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. संस्थापक रफिक शाद नदवी यांच्या अध्यक्षतेखाली व सतलज राहत इंदौरी यांच्या उपस्थितीत डॉ. हसनेन आकीब व फसिउल्लाह नकिब यांच्या हस्ते ‘उर्दू शायरी का संत’ हा पुरस्कार देऊन डॉ. गायकवाड यांना गौरविण्यात आले.
आज जेव्हा संपूर्ण जगामध्ये भाषा, प्रांत, जात, धर्म यांच्या नावाखाली माणसे वाटली जातात, त्याकाळात भारतीय संत परंपरेप्रमाणे मराठीतील स़ंत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेशवर किंवा सुफी संत परंपरेप्रमाणे संत तुलसीदास, नानक किंवा संत कबीर यांच्याप्रमाणेच डॉ. गणेश गायकवाड हे आपल्या शायरीतून जात, धर्म, पंथविरहीत फक्त मानवतावादी समाजाचा पुरस्कार करतात. त्यांच्या या प्रेरणादायी विचारांमुळे समाजात सांस्कृतिक एकोपा जोपासला जातो आहे, डॉ. गायकवाड यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आधुनिक ‘उर्दू शायरीतील संत’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.