अमडापूर ( बुलडाणा): यावर्षी मोठय़ा नैसर्गिक संकटातून जगविलेले पिक वाचविण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, या मागणीसाठी येथील शेतकर्यांनी आज २८ सप्टेंबर रोजी वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने अनेक शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागले. तर यातून वाचविलेल्या पिकांना आता पावसाने उघाड दिल्याने सोयाबिन-तूर-कपाशी ही िपके सुकत आहेत. विहिरी, तसेच नदी नाल्यांमध्ये पाणी सुध्दा उपलब्ध आहे. मात्र गेल्या चार दिवसां पासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकर्यांना अडचण निर्माण होत आहे. अखेर याला कंटाळून आज येथील शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून उपकार्यकारी अभियंता चिखली यांना निवेदन दिले. यावर उपकार्यकारी अभियंता यांनी पावर ग्रीडमध्ये बिघाड झाला असल्याने विद्युत यंत्रणेवर क्षमतेपेक्षा जास्त भार झाला आहे. यामुळे परिक्षण उपकेंद्राकडून कृषी वाहिनीवर तातडीने अतिरीक्त भारनियमन करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे. त्या कारणाने सर्व कृषी वाहिनीवर तातडीचे भारनियमन करण्यात येत असल्याचे लेखी शेतकर्यांना दिले.
संतप्त शेतक-यांचा मोर्चा
By admin | Updated: September 28, 2014 23:15 IST