लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मातृतीर्थ राजमाता जिजाऊ यांच्या जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी, याकरिता महिलांनी लढा द्यायला सुरुवात केली आहे. दररोज जिल्ह्यातील प्रत्येक भागामध्ये महिला दारूबंदीसाठी एल्गार पुकारत असून, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयात निवेदन देत आहेत. न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांच्या चळवळीला बळ मिळाले आहे. सरपंच आणि ग्रामसेवक पैसे घेऊन दारू दुकानाला मान्यता देणारा ठराव पारित करू शकतात, याकरिता सर्वांनी दक्ष राहून १ मे रोजी ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव पारित करून घेतले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रोडला लागून असलेली दारूची दुकाने ५०० मीटर अंतरावर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झाल्यामुळे मद्य विक्रेत्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला. मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा दारूबंदी अभियानाच्या वतीने अनेक ठिकाणी सभाही पार पडल्या. विविध ठिकाणी झालेल्या सभेत आता जिल्ह्यात बंद झालेली दारूची दुकाने सुरू न होऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना उपासमारी, बेरोजगारी असे चित्र ग्रामीण भागात असताना दारूचे दुकान म्हणजे संपूर्ण परिवाराची जिवंतपणीच आत्महत्या होय, असा सूर यावेळी सभेला उपस्थित मान्यवर सतीशचंद्र रोठे, कॉम्रेड सुधीर देशमुख, शाहीर खांडेभराड, सतीश पाटील, सोपान बिचारे, सुरेखा निकाळजे या सर्वांच्या मनोगतातून निघाला. बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातील दारूबंदी अभियानाचे सभासद संदीप काकडे, शाहीर जयवंतराव गवई, योगेश कोकाटे, सुदाम हिवाळे, शाहीर प्रमोद दांडगे, शाहीर इंगळे गुरुजी, पद्मा जवरे, रेखा खरात, अमोल चव्हाण, विनोद धंदरे, उषा लहाने, सुलोचना हसले, शोभा बिचारे, मनोरमा डोके, प्रमिला सुशीला, गोकुळाबाई भातोकार, शीला इंगळे, रंजना सपकाळ, अजय जाधव, संजय मोरे, रवी भोंडे, जनार्धन झांबरे, वासुदेव जवरे, अनुराधा भावसार, अकील शहा, सावित्रीबाई मांडवगडे, हेमलता कांबळे, एस.बी. रूपने, नलिनी उन्हाळे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेचे संचालन साहित्यिक अजय जाधव यांनी केले तर आभार सतीश पाटील यांनी मानले. दारूमुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा लढा सुरूच!
By admin | Updated: May 24, 2017 00:28 IST