बुलडाणा : भंडारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आग लागून १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला हाेता. या घटनेनंतर आराेग्य यंत्रणा सतर्क झाली असून १३ जानेवारीला कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
बुलडाणा शासकीय कोविड सेंटर स्त्री रुग्णालय येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना फायर फायटरचे प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. सचिन वासेकर यांच्या देखरेखीखाली फायर फायटिंग प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी रुग्णालयात कोणत्याही कक्षात अचानक आग लागली तर तत्काळ कर्मचाऱ्याने काय करावे, आग कशी आटोक्यात आणावी, त्यावर कसे नियंत्रण करावे, त्यापासून सुरक्षा, बचाव याविषयी हे प्रशिक्षण होते. या फायर फाइटर प्रशिक्षणात शासकीय कोविड सेंटरमधील परिचारिका, कक्षसेवक सफाई कामगार, ब्रदर, डॉक्टर्स आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. याव्यतिरिक्त व्यवस्थापक संदीप आढाव, बुलडाणा आर्टीपीसआर लॅबचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, डॉ. असलम जमाल, हृषीकेश देशमुख आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती हाेती.