नांदुरा : रात्रीच्या अंधारात एफसीआयच्या बारदान्यात व्यापाऱ्याची तूर भरणाऱ्या हमालांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले व त्याप्रकरणी बाजार समितीने १२ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली; मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही याप्रकरणी कोणतीच गुन्ह्याची नोंद न झाल्याने १९ एप्रिलच्या संध्याकाळी ७ वाजेदरम्यान त्रस्त शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह पोलीस स्टेशन गाठले व तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.एफसीआयची शासकीय तूर खरेदी हेराफेरी का, गैरव्यवहार व व्यापाऱ्यांच्या तुरीची खरेदी होत असल्याने वादग्रस्त झाली आहे. ११ एप्रिलच्या रात्री शेतकऱ्यांनी अंधारात काही हमालांना एफसीआयच्या शासकीय बारदान्यात तूर भरताना रंगेहात पकडले. त्यानंतर रात्री शेतकऱ्यांनी याबाबत आंदोलन केले तेव्हा १२ मार्चला बाजार समितीचे प्रभारी सचिव भगत यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर काही हमालांना चौकशीसाठी पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी केली. त्यांनी याकरिता काहींची नावे पोलिसांना सांगितली; मात्र अद्यापही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला झाली नाही, कारण याबाबत सहायक निबंधक कृपलानी ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. पोलीस प्रशासनाला याबाबत मागणी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते वसंतराव भोजने, बाळासाहेब पाटील, राजेश एकडे, भगवान धांडे, संतोष डिवरे, लाला इंगळे, अनिल शिंगोटे, राजेश पोलाखरे, नीलेश कोलते, विठ्ठल अहिर, विनोद कोलते, इंगळे, अजय घनोकार आदींसह शेतकऱ्यांनी ठाणेदार पाटील यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी ठाणेदार पाटील यांनी शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबतची माहिती दिली व सहाय्यक निबंधक व इतर अधिकारी सहकार्य करीत नसल्याचे चर्चेतून समोर आहे. ठाणेदार पाटील यांनी कारवाईबाबत आश्वास्त केल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व सक्त मनाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
‘तूर खरेदी गौडबंगालप्रकरणी गुन्हा दाखल करा!’
By admin | Updated: April 20, 2017 01:22 IST