लोकमत न्यूज नेटवर्कमहारचिकना : लोणार तालुक्यातील महारचिकना या गावात भीषण पाणीटंचाई असून, प्रशासन गावाकडे दुर्लक्ष केले असल्याचे जाणवत आहे. गावात मागील एक महिन्यापासून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे, तसेच पाणीटंचाई असल्यामुळे विहिरीवर महिलांना पाणी भरण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावात दोन-तीन हातपंप असून, त्यातून आठ-दहा हंड्यांच्यावर पाणी निघत नाही. त्यातही रात्री-बेरात्री लोकांना पाणी भरण्यासाठी उठावे लागते. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरी आहेत; परंतु त्या विहिरींना रोज १० ते १५ मिनिटाच्यावर मोटारपंप चालत नाही. त्यामुळे गावाला पाणीटंचाईचे मोठे चटके सहन करावे लागत आहेत. त्यातसुद्धा गावातील विहिरीत पाणी सोडल्या जाते. त्या ठिकाणी महिला- पुरुषांची पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडते. त्यात पाणी भरत असताना कुणाचा धक्का जरी लागला तर विहिरीत पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याही परिस्थितीत महिला जीव धोक्यात टाकून विहिरीवर पाणी भरतात. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून गावाला पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचा प्रस्ताव तहसीलदार लोणार यांच्याकडे पाठविला आहे. तरी गावात लवकर टँकर सुरू करून किंवा कुणाची विहीर अधिग्रहित करून गावात पाणीपुरवठा करण्यात येईल.- सुमन संभाजी नागरे,सरपंच, महारचिकना, ता. लोणार.
महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत!
By admin | Updated: May 24, 2017 00:19 IST