आकोट: नजीकच्या आंबोडा येथील रामकृष्ण नारायण अस्वार (५0) या शेतकर्याने सततच्या नापिकीला कंटाळून ३0 मे रोजी सकाळी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.रामकृष्ण नारायण अस्वार यांच्याकडे ५१ आर शेतजमीन असून, त्यात त्यांनी सन २0१५ व २0१६ मध्ये केळीच्या पिकाची लागवड केली; परंतु दोन्ही वर्षे सतत अल्पवृष्टीमुळे त्यांना नापिकी झाली. अस्वार यांच्याकडे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचे ४८ हजार रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे. अशा स्थितीतच त्यांच्या मुलीचा विवाह ३0 एप्रिल रोजी झाला. सततची नापिकी, बँकेचे थकीत कर्ज व त्यातच मुलीच्या विवाहाचा ताण या सार्या बाबींना कंटाळून त्यांनी अरुण रेचे यांच्या शेता तील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत विनोद जगन्नाथ अस्वार यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह आकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गावंडे, पोलीस नायक महेश श्रीवास हे पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे ३0 मे २0१५ रोजी अपघातात निधन झाले होते. नेमक्या त्याच दिवशी त्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली.
आंबोडा येथे शेतकर्याची आत्महत्या
By admin | Updated: May 31, 2016 02:58 IST