खामगाव : बचत खात्यातील रक्कम कर्ज खात्यात वळती केल्याने शेतकर्याने बँकेतच ठिय्या दिल्याची घटना आज २७ सप्टेंबर रोजी स्थानिक पंजाब नॅशनल बँकेत घडली. अखेर सोमवारी यावर तोडगा काढू असे आश्वासन शाखाधिकारी यांनी दिल्यानंतर शेतकर्याने बँक सोडली. तालुक्यातील हिवरा येथील राजाराम निनाजी कवळे (वय ६५) यांचे येथील पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते आहे. तसेच त्यांनी या बँकेतून कृषी कर्ज घेतलेले आहे. राजाराम कवळे हे ल्युकेनिया (रक्ताचा कर्करोग) या आजाराचे रुग्ण आहेत. या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची गरज असल्याने राजाराम कवळे हे आज दुपारी बँकेत असलेल्या बचत खात्यातून १५ हजार रुपये काढण्यासाठी गेले होते. मात्र शाखाधिकारी यांनी त्यांना बचत खात्यातील रक्कम न देता राजाराम कवळे यांची स्टॅम्प तिकिट लावून कागदावर सही घेतली व त्यानंतर त्यांना पैसे न देता तुमचे खाते एनपीए मध्ये गेल्याचे सांगून सदर रक्कम कर्ज खात्यात वळती करण्यात आली. त्यामुळे आपणास पैसे देता येणार नसल्याचे सांगितले. मात्र सदर शेतकरी रक्ताच्या कर्करोगाचा रुग्ण असल्याने त्यांनी रितसर कर्ज वसुली करावी, पिक निघाल्यानंतर कर्ज भरतो असे सांगून उपचारासाठी पैश्यांची गरज असल्याने पैसे देण्याची विनंती शाखाधिकारी यांना केली. मात्र शाखाधिकारी यांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. तर पैसे काढण्यासाठी आलो व पैसे न घेताच घरी कसा जावू या व्दिधा मनस्थिती शेतकर्याची झाल्याने राजाराम कवळे यांनी बँकेतच ठिय्या मांडला होता. अखेर शाखाधिकारी यांनी त्यांना सोमवारी या पैसे देतो, असे तोंडी आश्वासन दिले. त्यामुळे शेतकर्यांने अखेर आपले आंदोलन मागे घेतले.
शेतक-याचा बँकेत ठिय्या
By admin | Updated: September 28, 2014 00:21 IST