यासंदर्भात आपण प्रथमत: जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चारवरिया यांना निवेदन देणार आहे. त्यानंतर या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याच्या गृहमंत्रालयास अनुषंगिक तक्रार देणार असल्याचे आ. गायकवाड यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या वर्षी राज्य शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उत्तम व्यवस्थापन केले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेही राज्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली होती.
यावर्षी गेल्या एक ते दीड महिन्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढली आहे. त्याची घातक तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने व्यापकस्तरावर पुन्हा उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. सोबतच विविध सामाजिक, राजकीय घटकांशीही विचार विनिमय करून उपाययोजना राबविल्या आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधाही बळकट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र अशा स्थितीत केंद्राकडून मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्याकडेही यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी तसा प्रकारे राज्यातील नागरिकांना मदत न करता उलट त्यांनी त्यास विरोध केला आहे. त्यामुळे मधल्या काळात राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूस या तिघांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. यासोबतच अनेक बाबींचा ऊहापोह त्यांनी १९ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.