गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ माजविल्याने पोलीस हैराण झाले होते. परंतु पोलिसांचे मात्र चोरट्यांपर्यंत हात पोहाेचत नसल्याने हतबल झालेल्या पोलिसांना गणेश पांडुरंग काटे याच्या घरात मोठ्या प्रमाणात विविध वस्तू असल्याची माहिती मिळाली होती. तर तो त्या अल्पदरात विक्री करीत असल्याच्या माहिती वरुन ठाणेदार राहुल गोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला असता त्याच्या घरातून पिठाची चक्की, मोटारपंप, हॅलोजन लाईट, पाण्याची मोटार, स्प्रिंकलर नवजल, मोटार केबल, सिगारेट पाकिटे, टेबल फॅन आदींसह १ लाख ९७ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तो माल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक करून मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राहुल गोंधे,संदीप सावले, शरद बाठे, प्रल्हाद टकले, गणेश देढे, कैलास चतरकर, विनोद फुफाटे, अमोल बोर्डे, राजेश गौंड, अनंता कळमकर, शेख इसाक, ज्ञानेश्वर शेळके, दिलीप जाधव, समाधान अरमाळ, प्रशांत अरसडे यांच्या पथकाने केली आहे.
अनेक चोऱ्यांचा उलगडा होणार?
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी गणेश पांडुरंग काटे याने बसथांबा चौकातील साई पान मंदिर फोडल्याची कबुली दिल्याची माहिती ठाणेदार राहुल गोंधे यांनी दिली आहे. त्याने या चोरीतील माल लपून ठेवलेला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आणखी किती चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.